आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


श्लोक ५-६


धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥

अर्थ-पांडव पक्षातील योद्ध्यांची नावे.
धृष्टकेतू- हा शिशुपालाचा मुलगा.भरसभेत भगवान श्रीकृष्णांनी ह्याच्या पित्याचा वध करून देखील तो पांडव पक्षातून लढत होता. पुढे तो द्रोनाचार्यांकडून मारला गेला.
चेकितान- केकय देशाचा राजा.हा धृष्टकेतूचा मुलगा जो दुर्योधानाकडून मारला गेला.
काशीराज – पांडव सेनेतील महारथी. भीष्मांनी काशीच्या स्वयंवर मंडपातून अंबा,अंबालिका आणि अंबिका या तिन्ही राजकन्यांना पळवून नेल्याने काशिराजाच्या मनात भीष्मांबद्दल राग होता.
पुरुजित व कुंतिभोज – हे दोघेही कुंतीचे भाऊ. कुंतीभोजाला अपत्य नव्हते.म्हणून त्याने कुंतीला दत्तक घेतले. भगवान श्रीकृष्ण हे कुंतीचे भाचे. कुंतिभोज अभिमन्यूचे पणजोबा. इथे एक गोष्ट लक्षात येईल की तब्बल चार पिढ्या या युद्धात रणांगणावर एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या. हे दोघेही युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले.
शैब्य- हा युधिष्ठिराचा सासरा.
युधामन्यु व उत्तमौजा – पांचाल देशाचे राजे. हे अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे संरक्षण करत होते. अश्वत्थाम्याने ह्यांना रात्री झोपलेले असताना मारले.
सौभद्र = अभिमन्यू ! सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णांची बहिण. सुभद्रेचा पुत्र म्हणून सौभद्र ! ह्याने गर्भावस्थेतच चक्रव्यूह भेद्नाचा मार्ग ऐकला होता. पण बाहेर पडायचा माहित नव्हता. दुःशासनाच्या मुलाकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने याचा मृत्यू झाला.
द्रौपदेय – पाच पांडवांपासून द्रौपदीला झालेले पुत्र ! युधिष्ठिरापासून–प्रतिविंध्य,भीमापासून –सूतलोम,अर्जुनापासून –श्रुतकर्मा, नकुलापासून- शतानीक व सहदेवापासून श्रुतसेन! रात्री झोपलेले असताना अश्वत्थाम्याने ह्यांची रात्री झोपेत हत्या केली. हे सर्व राजे महारथी आहेत. आतापर्यंतच्या श्लोकात दुर्योधनाने पांडव पक्ष सांगितला व द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांबद्दलचा द्वेष अजून वाढविला. या सर्वांचे नीट निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते की सर्व राजे हे पांडवांचे नातेवाईक नव्हते. काहींच्या नातेवाईकांना तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी ठार केले आहे. तरी देखील हे पांडवांच्या पक्षात युद्ध करत होते. यावरून हे खऱ्या अर्थाने धर्मयुद्ध होते हे लक्षात येईल. सद्यस्थितीत अशी परिस्थिती आपल्या समोर सुद्धा असते. एकीकडे राजसत्ता उच्छाद मांडते तर धर्मपक्षात मर्यादित मनुष्यबळ दिसते तेव्हा आपण मात्र पक्ष धर्मसत्तेचाच धरावा. कारण “ यतो धर्मः ततो जयः|“ जिथे धर्माचरण असते विजयश्री ही तेथेच नांदते.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy